नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने नियम धाब्यावर बसविणाऱ्या ३३९ बिगरमान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरोधातील कारवाई केली आहे. यात २५३ पक्षांना निष्क्रिय जाहीर केले आहे. तर अस्तित्वात नसलेल्या ८६ पक्षांची बिगरमान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या यादीतून गच्छंती करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अकरा पक्षांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण, दिल्लीतील पक्षांवरही कारवाई झाली.
निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रदीर्घ काळापासून निष्क्रिय राहिलेल्या पक्षांबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. त्याआधारे आयोगाने आज २५३ पक्षांना निष्क्रिय जाहीर केले आहे. राज्यपातळीवरील पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत विशिष्ट प्रमाणात मते मिळवून शकणारे पक्ष तसेच नोंदणी केल्यानंतरही कधीही निवडणूक न लढलेल्या पक्षांना बिगरमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष म्हटले जाते.


