मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी कोर्टानं नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. रत्नागिरी पोलिसांनी आता राणेंचा ताबा महाड पोलिसांकडे सोपवला आहे. रत्नागिरी-रायगड सीमेवर ही प्रक्रिया करण्यात आली. नारायण राणे यांना महाड कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
नारायण राणे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे.नारायण राणे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पथक रवाना झालं आहे. या पार्श्वभूमीवर अँम्ब्युलन्स देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. राणे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊ शकते.
नारायण राणेंविरोधात राज्यात विविध ठिकाणी तीन गुन्हे दाखल आहेत. हे तीन गुन्हे रद्द करण्यासाठी राणेंची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर नोटीस न बजावताच कारवाई कशी सुरू केली? असा सवाल याचिकेत विचारण्यात आला होता. याचिकेवर थोड्याच वेळात तातडीच्या सुनावणीची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, नारायण राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं स्पष्ट नकार दिला आहे.
नारायण राणे यांना महाड एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात येणार आहे. महाड एमआयडीसी पोलिस स्टेशनबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर आजच नारायण राणे यांना हजर करण्यात येईल.दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर संगमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. राणे यांना नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली होती. नारायण राणे यांना त्यांच्या गाडीतून पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नारायण राणे यांच्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड हे आहेत. नारायण राणे यांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. कोणते कलम लावण्यात आले याची माहिती देण्यात आली. नाशिक पोलिसांचं पथक देखील कोकणात दाखल झालं आहे. त्यामुळे सकाळपासूनच नारायण राणे यांच्या अटकेबाबत चर्चा सुरू होती. दुसरीकडे, शिवसेना आक्रमक झाली आहे. या यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहे. मुंबईसह राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.