अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच विधानसभेत सरकारची भूमिका मांडली.आघाडीचे सरकार हे केवळ बोलणारे नाही, तर काम करून दाखवणारे सरकार आहे व ते आम्ही कृतीतून दाखवून देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. झोपडपट्टीवासी, गिरणी कामगार, सफाई कामगारांसह सर्वांना घरे मिळावीत यासाठी आघाडी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. म्हाडाच्या माध्यमातून घरांच्या उभारणीला गती देण्यात आली आहे. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या इमारतींचे सेवाशुल्क आणि उपनगरातील इमारतींना अकृषी करांतून सूट देण्यात येत असून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हे सरकार अभय योजना जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने योजना जाहीर केल्या आहेत.पण त्याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येत आहेत. धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे. पण राज्य सरकारने ८०० कोटी देऊनही रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप जमिनीचा ताबा दिला जात नाही. केंद्राकडे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्रामुळेच धारावीचा पुनर्विकास रखडल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.रखडलेल्या प्रकल्पांसाठी अभय योजना आणतो आहोत त्यातून या रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.