देशातील कोरोनाव्हायरस संकट दूर होत नाही तोच एका धोकादायक व्हायरसनं शिरकाव केला आहे. ‘निपाह’ असं या व्हायरसचं नाव आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसनं थैमान घातलं आहे . आतापर्यंत 251 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे निपाह व्हायरसमुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नागरिकांमध्ये निपाह विषाणूची लक्षणं दिसू लागल्यानंतर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
कोझिकोड परिसरातच सुमारे 11 लोकांमध्ये निपाह विषाणूची लक्षणं आढळून आली आहेत. पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण 8 उच्च जोखमीचे संपर्क नमुन्यांसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत मुलाच्या वडिलांच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचे नमुने निगेटिव्ह आले, ही बाब समाधानकारक असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
निपाह व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या संपर्कात 251 नागरिक आल्याची माहिती समोर आली आहे. त्या सगळ्यांना आयसोलेट करण्यात आलं आहे. त्यात 129 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वैद्यकीय पथक सातत्यानं या नागरिकांवर लक्ष ठेवून आले. त्याचबरोबर एनिमल हस्बेंड्री टीम देखील ज्या ठिकाणी वटवाघळं येण्याची शक्यता अशा परिसराची पाहाणी करत आहे. तिथूनही नागरिकांचे नमुने गोळा केले जात आहेत.
निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारला सतर्क राहण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. केंद्रानं राज्य सरकारला याबाबत एक पत्र लिहिलं आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हॉस्पिटल्स तयार करण्याविषयी सूचना दिल्या आहेत. केंद्राकडून कोझिकोडला एक टीम आधीच पाठवण्यात आली आहे, ज्या टीमकडून प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे.