प्रतिनिधी पांडुशेठ साठम
कै. सत्यविजय भिसे यांचा शिवडाव येथे १९ वा स्मृतिदिन साजरा
सिंधुदुर्ग: कै. सत्यविजय भिसे यांनी समाजपयोगी काम करून रंजल्या गांजलेल्यांना मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. गोरगरीब जनतेला वैद्यकीय उपचारासाठी मदत करणे, लोकांच्या अडी अडचणी हिरहिरीने सोडवणे असा सेवाभावी गुण सत्यविजय भिसे यांचा होता. तरुण पिढीला त्यांच्या गुणांचे अवलोकन झाले पाहिजे. यासाठी त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. सत्यविजय भिसे यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवून तरुणपिढीने त्यांचा समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे हीच खरी भिसे यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने शिवडाव येथे सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते भिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, १९ वर्षा नंतर सुद्धा भिसे यांच्या स्मृतिदिनाला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली यातूनच त्यांच्याबद्दल जनतेमध्ये असलेले प्रेम दिसून येते. मी पण एक सहकारी म्हणून त्यांच्यासोबत काम केले आहे. अन्यायाविरुद्ध लढणं हा त्यांचा गुण होता. त्यांचाच आदर्श घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला असे त्यांनी सांगितले.
यावेळी सतीश सावंत म्हणाले, कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन गेली १९ वर्ष साजरा केला जात आहे. मात्र मी पहिल्यांदाच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. भिसे यांची ज्या अपप्रवृत्तीने हत्या केली त्या अपप्रवृत्ती राजकारणातून हद्दपार झाल्या पाहिजेत. त्यासाठी माझे देखील प्रयत्न सुरु आहेत. असे सांगत भिसे यांना श्रद्धांजली वाहिली.
संदेश पारकर म्हणाले, सत्यविजय भिसे यांनी तळागाळातील लोकांपर्यत पोहचून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. मात्र अपप्रवृत्तीला त्यांचे कार्य मान्य न झाल्याने त्यांना संपविण्यात आले. जिल्हावासियांनी या अपप्रवृत्तीला ठेचायचे काम केले आहेच परंतू यापुढेही आपण सर्वांनी एकत्र येऊन अपप्रवृत्ती विरोधात लढण्याचे काम करूया असे आवाहन संदेश पारकर यांनी केले.
यावेळी कणकवली नगरसेवक,गटनेते सुशांत नाईक,जेष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, बाळा भिसे,संदेश सावंत, शिवडाव सरपंच वनिता जाधव, कळसुली सरपंच सौ. परब, अरविंद दळवी, रवी सावंत, श्रीकांत तेली, सोमा घाडीगावकर, नितीन हरमलकर, गणेश शिवडावकर, राजू पाताडे, दीपक कोरगावकर, निकेतन भिसे, बंडू लाड, संजय पारकर, वैभव काळेकर, सुनील पारकर, मधुकर चव्हाण, सत्यविजय जाधव, अनंत जाधव, सुनील पारकर आदींसह सत्यविजय भिसे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.