तौक्ते चक्रीवादळाची नुकसान मदत म्हणून 44 कोटी 98 लाख 53 हजार 400 रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार
मुंबई – राज्यातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तीचा वारंवार सामना करावा लागत आहे.या आपत्तीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी बहुउद्देशीय निवारा केंद्रे, भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारे, लाईटनिंग अरेस्टर सुविधा उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तौक्ते चक्रीवादळाची नुकसान मदत म्हणून 44 कोटी 98 लाख 53 हजार 400 रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले
यासाठी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच या भागातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकण किनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.