प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- रत्नागिरी टपाल विभागाने ग्रामीण डाक जीवनविमा योजनेकरिता घेण्यात आलेल्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ‘महालॉगिन डेला ‘ग्रामीण डाक जीवनविम्याचा १ कोटी ८१ लाख रुपयांचा विक्रमी हप्ता एका दिवसात गोळा केला. यामुळे रत्नागिरी विभागाने देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
आजवर झालेल्या कामगिरीशी तुलना करता रत्नागिरी विभागाने केलेली ही कामगिरी आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. टपाल विभागाने ३२०० कुटुंबांना विमा संरक्षण दिले. हे सर्व नवीन ग्राहक पोस्टाच्या कुटुंबात समाविष्ट झाले आहेत. लवकरच जिल्ह्यातील सर्वच कुटुंबांना विमा संरक्षित केले जाईल, अशी माहिती डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी दिली.

