कोकण रेल्वे थांब्यांवरून प्रचंड असंतोष; आंदोलनाचा इशारा
ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात आलेल्या हिवाळी विशेष गाड्यांवरून प्रवाशांमध्ये मोठा संताप उसळला आहे. या विशेष गाड्यांना कोकणातील महत्त्वाच्या तालुका आणि शहरांतील स्थानकांवर थांबा न देण्याच्या निर्णयामुळे अखिल कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आक्रमक भूमिका घेतली असून मध्य रेल्वेला निवेदन देत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
समितीचे अध्यक्ष व सचिव महापदी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-करमळी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस–अनाथपूरम या हिवाळी विशेष गाड्यांना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर — विशेषतः महाड, खेड, राजापूर रोड, वैभववाडी, सावंतवाडी — येथे थांबा देण्यात आलेला नाही. कोकण पट्ट्यातील मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी अडचण असून, सुट्ट्यांच्या काळात नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने प्रवाशांची मदार या विशेष गाड्यांवर होती. मात्र थांबे नसल्याने स्थानिक प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.
समितीने स्पष्ट केले की भविष्यात जाहीर होणाऱ्या सर्व सुट्टीतील किंवा विशेष गाड्यांना कोकणातील प्रमुख स्थानकांवर अनिवार्यपणे थांबा देण्यात यावा. अन्यथा प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होईल व आंदोलनाचा पर्याय खुला ठेवावा लागेल, असा इशारा समितीने दिला आहे.
दरम्यान, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने ख्रिसमस–नववर्षाच्या गर्दीचा अंदाज घेऊन २५ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा, कर्नाटक, केरळ आणि कोकणातील प्रवाशांसाठी २२ गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारचे डबे उपलब्ध करून देत रेल्वे प्रशासनाने उत्सवी काळातील प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र या गाड्यांना स्थानिक थांबे नसल्याने सर्वसामान्य कोकणातील प्रवासी अजूनही अडचणीतच असून, प्रशासनाने तातडीने सुधारित थांबे जाहीर करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.


