कोरोनाचा फटका बसला तरी दशावतार कलेने पुन्हा उभारी घेतली -आ. वैभव नाईक

0
106

अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

सिंधुदुर्ग: प्रतिनिधी पांडुशेठ साठम

अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन गुरुवारी पदमश्री पुरस्कार विजेते श्री. परशुराम गंगावणे यांच्या विश्राम पपेट थिएटर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, संजय पडते, काका कुडाळकर, सतीश लळीत, यशवंत तेंडोलकर, गजा बांबुळकर, तुषार नाईक, दत्तप्रसाद शेणई, दादा राणे-कोनस्कर, आबा जोशी, राजा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व पदमश्री परशुराम गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, अकादमीने गेल्या वर्षभरात अत्यंत चांगले काम केले आहे. दशावतारी कला आपल्या कोकणची ओळख आहे. या कलेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. कोरोनाचा फटका बसला असताना देखील दशावतार कलेने पुन्हा उभारी घेतली आहे. राज्य सरकार कडून कलाकारांसाठी पेंशन योजना सुरु आहे.अनेक कलाकारांना याचा लाभ मिळत आहे. तसेच अन्य योजनांचा लाभ कलाकारांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. अकादमीच्या माध्यमातून देखील कलाकारांच्या अडचणी सोडविण्याचे काम झाले पाहिजे यासाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य केले जाईल असे आ. वैभव नाईक यांनी आश्वासित केले.

दशावतार कलेची पार्श्वभूमी, दशावतारात काळानुसार होत गेलेला बदल, सादरीकरणाचे नियोज़न संस्कृती संवर्धानाबाबत नवीन कलाकारांची जबाबदारी या विषयावर दयानंद तुळपुळे, आपा दळवी, आबा जोशी, यशवंत तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान अतुल बंगे, अमरसेन सावंत, राजू कविटकर, आनंद कुंभार, बाळू पालव, आबा खवणेकर, सुधाकर वळंजू, मंजुनाथ फडके, सौरभ पाटकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकादमीचे अध्यक्ष बाळकृष्ण गोरे, समीर तोंडोलकर, श्री. तांबे,दयानंद तुळपुळे व अकादमीचे सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here