कोरोनाची राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४५ रुग्ण आढळले आहे. राज्य एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या रविवारच्या अहवालात हे स्पष्ट झाले. डेल्टा प्लसचे सर्वाधिक १३ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले असून पुण्यात ३, तर औरंगाबाद, बीड जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक २० रुग्ण १९ ते ४५ वयोगटात आढळले असून त्याखालोखाल ४६ ते ६० वयोगटातील १४ रुग्ण आहेत. १८ वर्षांखालील ६ बालके आणि ६० वर्षांवरील ५ रुग्ण आहेत.रत्नागिरीत डेल्टा प्लसने एक मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरूप सौम्य ते मध्यम स्वरूपाचे आहे.
कोविड प्रतिबंध आणि नियमित उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेन्सिंग) नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. जिनोमिक सिक्वेन्सिंग दोन प्रकारे करण्यात येत असून त्यासाठी राज्यातील ५ प्रयोगशाळा आणि ५ रुग्णालयांची सेंटिनल सेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे.