कोरोना महामारीचा हाहाकार देशभरात अजूनही चालू आहे.आप्त-स्वकीयांच्या मृत्यूमुळे देशभरातच केंद्र सरकार वर टीका होत आहे. अशात आता केंद्र सरकारने कोरोना संबंधित तपासणी आणि उपचार प्रकियेचा आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करून या योजनेची व्याप्ती आणखी वाढवली असून त्यात ऑक्सिजन पुरवठा आणि कोरोनासाठीच्या औषधोपचारांचा समावेश केला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी आयुष्मान भारत किंवा पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून लाभ मिळू शकतो, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयुष्मान भारत योजनेत जवळपास सर्व आजार कव्हर केले जातात. कॅन्सर शस्त्रक्रिया, रेडएशन थेरपी, केमोथेरपी, हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, दातांची शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यासह एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या तपासण्यांचा योजनेत समावेश आहे. सर्दी, खोकला, तापासारख्या आजारांचा या योजनेत समावेश नाही. परंतु,कोरोनाची हीच लक्षणे असल्याने त्याचा समावेश योजनेत आहे.
या योजनेतून 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच्या योजनेचा लाभ देखील मिळतो. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत.ग्रामीण भागातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे पक्के घर नाही, अशा व्यक्तीही या योजनेला पात्र आहेत. ज्या कुटुंबात कोणीही वयस्कर (16 ते 59 वर्षे) व्यक्ती नाही, जे कुटुंब महिला चालवतात. कुटुंबात कोणी दिव्यांग असेल, कुटुंब अनुसुचित जाती- जमातीतील असेल, व्यक्ती भूमिहीन आणि मजूर, बेघर, आदिवासी किंवा कायदेशीर मान्यता असलेला पारंपरिक मजूर असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो