दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या सरंपंचाचे कौतुकही केले.
आपण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगतांना त्यांनी गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला.
राज्यात नवीन ऑक्सीजनचे प्लांट आपण उभे करत आहोत. यासाठी ३ महिने ते १८ महिन्याचा कालावधी लागेल तोपर्यंत आपल्याला अतिशय सावधपणे पुढे जावे लागत असल्याचे सांगतांना राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य पुढे करावे, कोराना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांची उपलब्धता, त्याची सध्याची स्थिती याचीही माहिती दिली.
कोरोनाची दुसरी लाट सरकारी योजना नाही ज्याच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा केली जावी हे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेचे निमंत्रक न होता अशी भाषा करणाऱ्यांनी ज्या कुटुंबांनी आप्त स्वकीय गमावले, कर्ते गमावले अशा कुटुंबांच्या मदतीसाठी कोविड योद्धे होऊन काम करावे असे आवाहन केले