दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगाला हादरून सोडले.या दोन वर्षात अनेकांनी आपले सगे-सोयरे गमावले,लहान मुलांनी आपले दोन्ही आई-वडील गमावले,अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत.कोरोनाच्या लसीकरणानंतर आता कुठे कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना सर्व देशांना थोडा दिलासा मिळत होता. पण या कोरोनाने आता पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट बीए- 2 ने चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने (WHO) जगभरातील देशांना गंभीर इशारा दिला आहे.दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आणि कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जगभरातील इतर देशांची देखील चिंता वाढली आहे.काही देशांमध्ये लसीकरणाविषयी गैरसमज आणि जनजागृतीचा अभाव या गोष्टी देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यास कारणीभूत ठरल्या असण्याची शक्यता WHOने व्यक्त केली आहे.