देशात अनेक राज्यात कोरोनाचे थैमान चालूच होते. तरीही अनेक राज्यात निवडणुकीच्या रॅली आणि प्रचार चालूच होता.पसरत चाललेल्या कोरोनाच्या संक्रमणाकडे गांभीर्याने न पाहता राजकारण करण्यातच अनेक राजकीय नेते धन्यता मानत होते. कोरोनाचे सारे नियम यावेळी या राज्यातून धुडकावून लावण्यात आले, तर जेथे कोरोना संक्रमण वाढत होता असा ठिकाणीही कोणताही निर्बंध लावण्यास याच नेत्यांनी विरोध दर्शविला.
पण आता कोरोनाचे संक्रमण जसजसे वाढू लागले तस तसे निवडणूक आयोगालाही जाग आली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात आयोगाने पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर लगाम कसली आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला आणि पक्षाला कोरोना नियमांचे पालन करावे लागेल. याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल.
यापुढील प्रचारात रात्री 7 वाजेपासून सकाळी 10 पर्यंत कोणताच पक्ष प्रचार करू शकणार नाही. याशिवाय, मतदानाच्या 72 तासांपूर्वीच प्रचार संपवावा लागेल. यापूर्वी मतदानाच्या 48 तासांपूर्वीपर्यंत प्रचार करण्यास मुभा होती. बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान होत आहे, यातील 4 टप्प्यातील मतदान झाले आहे. शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.पश्चिम बंगाल,असाम, तमिळनाडू, केरळ,आणि पुड्डुचेरीमध्ये कोरोना रुग्णांची वाढ आणि मृत्यूमध्येही 45% वाढ झाली आहे.