कोविड पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे 21 जूनपासून राज्यांतील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर (लेव्हल्स) ठरवेल, असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. सध्या राज्यात 16 हजार 570 ऑक्सिजन बेडसवर रुग्ण असून ही संख्या 35 हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही.
राज्यात आज 9,830 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,890 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,85,636 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,39,930 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.64% झाले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दिलेल्या आकडेवारीनुसार 17 जून 2021 रोजी विविध जिल्ह्यांतील ऑक्सिजनसुविधायुक्त खाटा आणि पॉझिटिव्हिटी दर तक्ता नमूद केला आहे. या आकडेवारीच्या आधारे, 4 जून 2021 रोजीच्या शासन आदेशाचा संदर्भ घेऊन त्या त्या प्रशासकीय क्षेत्रात कोणत्या स्तराची बंधने लागू करावीत, याबाबतचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी घेऊ शकतील. एखाद्या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक प्रशासकीय क्षेत्रे असल्यास त्यांनी या आकडेवारीचे प्रमाणबद्ध विभाजन करून एक एका क्षेत्राचा निर्देशांक निश्चित करावा आणि त्यानुसार निर्णय घ्यावा.