रत्नागिरी- अनेक दिवसांपासून रखडलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाला चालना मिळणार आहे. त्यासाठी 13 कोटी 77 लाखाचा जादा खर्चाचा प्रस्ताव आठवड्यात शासनाला सादर केला जाणार आहे. या प्रस्तावामध्ये सिंथेटिक ट्रॅक, टर्फ फुटबॉल ग्राउंड, मल्टिपर्पज हॉल, बॅडमिंटन कोर्ट, व्हियापी आणि साधे सुट असणार आहे. खेळाडुंना दर्जेदार सुविधा मिळाव्या, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली.
दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड व संबंधित अधिकारी उपस्थित होते. उदय सामत क्रीडा मंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलासह जिल्ह्यात मोठे जिल्हा क्रीडा संकुल मंजूर करून आणले होते. एमआयडीसीत त्याचे काम सुरू झाले. सुमारे 8 कोटी रुपये त्यावर खर्च झाले आहे. त्यामध्ये संरक्षक भिंत आणि कार्यालयाचेच काम झाले आहे. निधी नसल्याने हे काम काही वर्षे रखडले होते.