ख्यातनाम हास्यकवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन ; मराठी साहित्यविश्वात शोककळा
विदर्भातील नामांकित हास्यव्यंग कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने मराठी हास्यकाव्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा दुवा तुटला आहे. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील काव्य, साहित्य आणि व्यंग वर्तुळात शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे त्यांच्या विलक्षण हास्यरस, व्यंगात्मक शैली आणि समाजप्रबोधनात्मक काव्यरचनेमुळे लोकप्रिय होते. त्यांच्या कवितांमधून विनोदाची फटकारणारी पण समाजाला अंतर्मुख करणारी मांडणी दिसून यायची. ‘जांगडबुत्ता’ हा त्यांचा खास शब्द देशभरातील हास्यकवी संमेलनांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता.
जवळपास २० कविता संग्रह प्रकाशित करून त्यांनी मराठी कवितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांच्या सादरीकरणात विनोद, उपरोध, सामाजिक जागरूकता आणि सहजता यांचा सुंदर संगम आढळत असे.
सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीत त्यांच्या हलक्याफुलक्या विनोदी कवितांमुळे लोकांना प्रचंड मानसिक समाधान मिळत असे. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाचे मोठे नुकसान झाले असून, राज्यातील साहित्यिक, कवी, आणि चाहत्यांनी त्यांच्या योगदानाची कृतज्ञतेने आठवण केली आहे.
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी सर्वांच्यावतीने प्रार्थना व्यक्त केली जात आहे.


