कोकण आणि गणेशोत्सव हे आगळे समीकरण आहे.कोकणात गणपतीचे आगमन अगदी मनमोहक असते.पावसाळ्याच्या ऋतूत येणार हा पहिला मोठा सण. हिरवागार निसर्ग आणि त्यातून घरी वाजत गाजत आणण्यात येणारा लालचुटुक रंगाचा गणपती ,आणि प्रत्येक गावात मुंबईत नोकरीनिमित्त गेलेला चाकरमान्याची घरी बाप्पाच्या स्वागतासाठी येण्याची धडपड सगळं काही अवर्णनीयच!
अगदी आजही हेच चित्र कोकणात जाणाऱ्या सगळ्या वाहतुकीच्या स्थानकांवर पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा महामार्ग एसटी, खासगी बसेस आणि चारचाकी वाहनांनी दुथडी भरून वाहत आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.महामार्गाचे १२ वर्ष रखडत चाललेले काम,त्यावरील असंख्य खड्डे त्यामुळे वाढलेला प्रवासाचा त्रास आणि ताण असूनही चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर गणपतीसाठी घरी पोचण्याची घाई दिसत आहे.


