मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हाप्रमुखांना निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला असून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील.
चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याचा निर्णय झाल्याची माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, चंदगड हा अपवाद असेल, कारण तेथील स्थानिक प्रश्न आणि राजकीय समीकरण पाहता दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये महाविकास आघाडी ताकदीने एकत्रितपणे निवडणूक लढवेल, असे त्यांनी नमूद केले.
शशिकांत शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चर्चा सुरू आहे. त्या चर्चांना मिळणाऱ्या प्रतिसादानुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील. सध्या आम्ही निवडणुकीवर फोकस केलेला आहे आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीला प्राधान्य देत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यास प्राधान्य देणार आहे. “महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत आणि तशीच निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे,” असेही त्यांनी सांगितले.
हे पण वाचा : अतुल बंगे दाम्पत्यांची हुमरमळा वालावल गावातील सर्व सामान्यांसाठी जनसेवा सुरूच!


