चंद्रनगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
दापोली– महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथे प्रभावी अंमलबजावणी सुरु असून या अभियानास गावातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हे पण वाचा ठाण्यात धक्कादायक प्रकार: सरबतात गटाराचे पाणी ! मनसेकडून कारवाई

दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपूर्ण राज्यभरासाठी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. दि. १७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या काळात हे अभियान महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावात राबवायचे असून या अभियानांतर्गत विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व हरित गाव, नरेगा व इतर योजनांचे अभिसरण, उपजिविका विकास, सामाजिक न्याय, लोक सहभाग व श्रमदानातून लोक चळवळ तयार करणे तसेच इतरही विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन चंद्रनगर ग्रामस्तरावर करण्यात आले आहे. चंद्रनगर ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत असलेल्या या अभियानात गावातील सर्वच नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.
जलसमृद्ध गाव अंतर्गत वनराई बंधारा, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी सी सी टिव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे यांसारखे उपक्रम सध्या राबविले जात आहेत. नुकत्याच चंद्रनगर ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत प्लास्टिक बंदी उपाययोजना व अंमलबजावणी उपक्रमाची प्रभावी सुरुवात करण्यात आली. गावातील सर्व लोकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. असाच उपक्रम भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून चंद्रनगर शाळेत राबविण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच भाग्यश्री जगदाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी संदीप सकपाळ आदींच्या मार्गदर्शनाखाली या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्वच उपक्रमांमध्ये ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून या अभियानात घवघवीत यश संपादन करण्याचा ग्रामस्थांनी निश्चय केला आहे.


