⭐बंगळुरु येथे आठ महिन्यांच्या बाळाला लागण
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l बंगळुरु l 06 जानेवारी
चीननंतर आता भारतामध्येही 8 महिन्यांच्या चिमुकलीमध्ये हा व्हायरस आढळला असून तिच्यावर उपचार चालू आहेत. भारतामध्ये आजच पहिला रूग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता HMPV चा कहर सुरू होणार की काय, अशी धास्ती निर्माण झाली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-६-जानेवारी-राष्ट्रीय-पत/
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्यानंतर आता एचएमपीव्ही व्हायरसचा चीनमध्ये मोठ्या वेगाने प्रसार होत आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असतानाच आता या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण भारतात आढळून आला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथील प्रयोगशाळेने याची पुष्टी केली आहे मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
मुलाला सातत्याने ताप होत असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नियमित रक्त तपासणी दरम्यान या विषाणूची पुष्टी झाली. कर्नाटकमधील आरोग्य विभागाने या विषाणूचे प्रकार कळवलेले नाहीत, मात्र विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी नमुने पुणे पाठवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या 8 महिन्याच्या मुलाचा चीनमधील प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. भारतात आढळलेला एचएमपीवी विषाणू वेगळा आहे. चीनमधील विषाणू आणि इथे आढळलेल्या विषाणूचे स्ट्रेन संबंधित आहेत का, याबाबतही अद्याप कोणतीही माहिती नाही.त्यामुळे हे नमुने पुण्यातील लॅबमध्ये पाठवले जाणार आहेत.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
एचएमपीव्हीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सतत ताप येणे, खोकला आणि घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे अशी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.