चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत त्यांची पत्नी यांच्यासह 13 जणांचा तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिवावर आज दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले.जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव गुरुवारी मिलिट्री विमानाने दिल्लीतील पालम एअरबेसवर आणण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग यांनी बिपिन रावत यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली.
दिल्ली कँटमध्ये संध्याकाळी 4:56 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलींनी आपल्या आई-वडिलांना एकाच चितेवर मुखाग्नी दिला. जनरल रावत यांच्या अंत्यविधीसाठी पार्थिव शरीरावरून तिरंगा हटवण्यात आला. हेच राष्ट्रध्वज त्यांच्या दोन्ही मुलींना सन्मानपूर्वक देण्यात आले.हिंदू धर्माच्या परमपरेनुसार अंत्यविधी पार पडला. दोन्ही मुलींनी आई-वडिलांच्या देहांवर चंदनाचा लेप लावला.जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना एकाच चितेवर दोन्ही मुलींनी मुखाग्नी दिला. यावेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमला.जनरल रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी 800 जवान उपस्थित होते. तिन्ही दलांच्या जवानांनी बिगुल वाजवला. सोबतच, लष्करी बँडने शोक गीत गायले.आई-वडिलांच्या चितेला मुखाग्नी दिल्यानंतर दोन्ही मुली गहिवरल्या. यावेळी नातेवाइक त्या दोघींचे सांत्वन करत होते.