जागतिक बाजारपेठेत शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न करणार – कृषि मंत्री दादाजी भुसे

0
75

शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत विक्री व निर्यातीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन, शेतमालाची निर्यात मोठ्याप्रमाणत वाढावी याकरिता राज्यस्तरावर कृषी विभागामार्फत कृती दल गठीत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज नाशिक पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी मोहत्सवाचे उद्घाटन कृषि मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, मालेगावचे उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, नाशिक गटविकास अधिकारी डॉ.सागरीका वारी, आदि मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

कृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांची रोगप्रतिकार क्षमता वाढावी यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कृषिमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिविभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान रानभाजी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व असून त्या पौष्टीक व जीवनसत्वयुक्त असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील नागरीकांनाही त्याची माहिती मिळावी हा या सप्ताहाचा महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे रानभाजी महोत्सव एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता पावसाळ्यात दर रविवारी किंवा महिन्यातून किमान एक-दोनवेळा याचे आयोजन करावे, अशा सुचनाही कृषि मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्टे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होऊन, ग्राहकांना आरोग्यपूर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. कोरोना सारख्या परिस्थितीतही शेतात कष्ट करून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिला आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांनी केलेल्या या कामाबद्दल आदर व्यक्त केला पाहिजे, असे आवाहनही यावेळी कृषि मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कृषि मंत्री श्री.भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरीकांना आपण आणलेल्या रानभाज्यांची सविस्तर माहिती देवून ओळख करून द्यावी. तसेच आपला पत्ता किंवा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून द्यावा. जेणे करून नागरीकांना जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ते आपल्याशी संपर्क साधून रानभाजी विकत घेवू शकतील. तसेच कृषि विभागाने या आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा अनुभव व ज्ञानाचा फायदा करू घेवून, सदर रानभाज्यांची माहिती ही पुस्तक स्वरूपात तयार करून जतन करावी व त्या माहितीची जनजागृती व प्रसार करावा, तसेच हे प्रदर्शन भरविण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना देऊन कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक कृषि मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

यावेळी रानभाज्यांचे संवर्धन, संकलन व प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कृषि विभागातील युरीया ब्रिकेट अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. या महोत्सवात जिल्हाभरातून अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले असून, एकुण 77 भाज्यांचे प्रदर्शनात समावेश करण्यात येऊन 25 भाज्या ह्या विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. यावेळी कृषि विभागाने तयार केलेल्या रानभाजी माहिती पुस्तिकेचे कृषिमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here