कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ‘ब्रेक दि चेन’मध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
ब्रेक दि चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असेही स्पष्ट केले.
नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवायचे आहे.तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.