तळेरे / निकेत पावसकर
भांडुपच्या मॅग्नेट मॉल येथे “जुनं फर्निचर” या चित्रपटाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता. यावेळी या चित्रपटातील प्रमुख कलाकारही उपस्थित होते. या प्रयोगाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमारे 400 हून अधिक प्रेक्षकांनी या शोसाठी हजेरी लावली होती. मॉल मधील सिनेपोलीस मल्टिप्लेक्स मध्ये शोला सुरुवात झाली. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार मेधा महेश मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि चित्रपटाचे निर्माते यतीन जाधव उपस्थित होते. या कलाकारांनी यावेळी प्रेक्षकांशी आणि पत्रकारांशी संवाद साधला आणि चित्रपटाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या चित्रपटातून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुले यांच्या नात्यांमधील वास्तव दर्शवण्यात आले आहे सर्व कुटुंबाने सोबत पहावा असा हा चित्रपट आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेदीका-मुलूख-हिची-आदर्श-व/
आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा असा हा चित्रपट असून त्याला ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन मुंबई जिल्हा सहकारी हाउसिंग फेडरेशनचे संचालक आणि दैवज्ञ समाजाचे युवा प्रमुख विशाल कडणे यांच्या वतीने करण्यात आले होते. आजच्या तरुण पिढीचे डोळे उघडावे, आपल्या पालकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या हा चित्रपटातून दिलेला सामाजिक संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा अनोखा उपक्रम विशाल कडणे यांच्याकडून राबविण्यात येत आहे. विशाल कडणे यांच्या माध्यमातून मनाच्या संवेदनशीलतेला हात घालणारा, युवकांना प्रेरणादायी व उत्कृष्ट कथानक असलेल्या जुनं फर्निचर असा हा चित्रपट सर्व प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळत असल्यामुळे सर्व प्रेक्षक वर्गातून त्यांचे आभार आणि कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. सदर सिनेमाचे कोकण, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग येथे मोफत शो आयोजित करणार असल्याचे आयोजक विशाल कडणे यांनी सांगितले.
छायाचित्र :
भांडुप : येथील विशाल कडणे यांनी “जुनं फर्निचर” या चित्रपटाचा विशेष प्रयोग आयोजित केला होता. यावेळी या चित्रपटातील कलाकारांचा विशेष सन्मान विशाल कडणे यांच्या हस्ते करण्यात आला.