टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता आणखी एक सहाय्यक कर्मचारी सदस्य कोरोना बाधित झाल्याचे बीसीसीआयच्या एका सूत्राने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. त्यातील अंतिम सामना 10 सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. इंग्लंडमध्ये कोरोना संसर्गासाठी सध्या कोणतेही नियम,निर्बंध नाहीत. येथील लहानापासून मोठ्यापर्यंत जवळजवळ सगळ्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे. हॉटेलमध्ये एका पुस्तक लोकार्पण कार्यक्रमाला टीम उपस्थित राहिली होती आणि त्यांनतर रवी शास्त्रींना रोगाची लक्षणे जाणवली. या पुस्तक लोकार्पण कार्यक्रमाला बाहेरच्या पाहुण्यांनाही आमंत्रित केले होते.


