मास्क सतत चेहऱ्यावर असेल तर कोरोनाच्या संसर्गापासून ९५ टक्के संरक्षण होते, असा निर्वाळा आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी चांगल्या प्रतिचे, काॅटनचे मास्क वापरावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांंनी अधिकाधीक मास्क वापरणे गरजेचे आहे; मात्र हे मास्क वापरतानाही ते योग्य पद्धतीने वापरले न गेल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो, असेही तज्ज्ञ सांगतात.
सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा प्रतिकार करताना कोरोनापासून वाचण्यासाठी डबल लेअरच्या मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव हवेतून होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्ती खोकली किंवा शिंकली तरी त्याचे काही शिंतोडे हवेत उडतात, त्यातून विषाणूही फेकला जातो. तो हवेत काही काळ जिवंत राहू शकतो. दुसऱ्या लाटेत अशाच विषाणूंपासून प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे.
हवेत काही काळ जिवंत असलेले हे विषाणू काही वस्तू किंवा पृष्ठभागावर राहिल्यास त्याला स्पर्श केल्यास त्यापासून आपल्याला संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच एकावर एक असे दोन मास्क बांधल्यास हवेतील कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग आपल्या श्वासाद्वारे शरीरात होणार नाही. त्यामुळे आताच्या कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी डबल मास्क वापरावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.