रत्नागिरी- जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएन्ट हा नवीन स्टेन सापडल्याची लेखी माहिती संबंधितांकडून आलेली नसल्याचे सरकारी उत्तर आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिले. जिल्ह्यात मे महिन्यात सहा आणि जून महिन्यात तीन असे एकूण नऊ व्हेरिएन्ट ऑफ कन्सर्न आणि व्हेरिएन्ट ऑफ इन्ट्रेस्टचे रुग्ण सापडले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अन्य तिघे उपचार घेत आहेत. त्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात आल्याची माहितीही या सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे रुग्ण सापडल्याचा दावा राज्याच्या आरोग्य यंत्रणेने केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये हे रुग्ण सापडल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने कंटेन्मेंट झोन करून फैलाव रोखण्याच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे रुग्ण सापडल्यावरून संभ्रमाचे वातावरण कायम आहे. मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणतात, जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही. तिकडे मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात प्रत्येक जिल्ह्यातून शंभर नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये राज्यात २१ डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे रुग्ण सापडले. यातील नऊ रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. दोघांच्याही या परस्परविरोधी दाव्यांमुळे गोंधळ निर्माण झाला. नेमके खरे कोणाचे, असा प्रश्न रत्नागिरीकरांना पडला आहे.