कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे, अशी या लढाईत शक्य होईल, तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग-व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्रालादेखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आतापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.यावर प्रतिसाद देताना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.
राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे. तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले.यावेळी औद्योगिक वसाहतींमध्ये यादृष्टीने सुविधा उभारण्यात येत आहेत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. उद्योगांना उभारायची लसीकरण केंद्रे ही वैद्यकीय जागेत नसल्याने तातडीने परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे ते म्हणाले तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील उद्योगांनी त्यांचे पूर्ण झालेले गृहनिर्माण प्रकल्प विलगीकरण केंद्रांसाठी द्यावेत, असे आवाहन केले.
याप्रसंगी माहिती देताना बलदेव सिंह यांनी सीआयआय आणि फिकीच्या समन्वयाने औद्योगिक वसाहतींमध्ये 93 चाचणी केंद्रे तसेच कामाच्या ठिकाणी 253 लसीकरण केंद्रे उभारण्यात येत असल्याची माहिती दिली.यावेळी बोलताना मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे येथील निर्बंधांचा संपूर्ण देशातील उद्योग-व्यवसाय आणि वितरण साखळीवर परिणाम होतो आणि म्हणूनच हे निर्बंध आम्ही अतिशय जड अंत:करणाने लावले आहेत. उद्योगांनी ऑक्सिजनची उपलब्धता त्वरेने करून देण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्धल त्यांनी धन्यवाद दिले तसेच एफडीए आयुक्तांनी पुढील कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.