कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व प्रशासनाच्यावतीने आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून यादृष्टीने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे.
बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. याद्वारे लहान मुलांवरील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, हॉस्पिटल, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. ‘म्युकर मायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा पुरवठा रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी तसेच यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या औषधांचा पुरवठा देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात 44 ऑक्सीजन जनरेशन प्लांट प्रस्तावित आहेत. यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी 2 असे एकूण 4 ऑक्सीजन जनरेशन प्लांट सुरू झाले आहेत, अन्य ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षांवरील अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात या आठवड्यात रुग्णदर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, ग्रामीण भागात अद्याप संसर्ग वाढत आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण होण्यासाठी कार्यवाही करा. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता, रेमिडेसिवीर इंजेक्शन तसेच म्युकरमायकोसिस आजारांवरील औषधसाठा, लहान बालकांसाठी आवश्यक औषध साठा, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी ‘ब्रेक द चेन’ च्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हायला हवे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस विभागाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.डॉ.सुभाष साळुंके म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास आवश्यक त्या वैद्यकीय सेवा सुविधा निर्माण करणे आवश्यक आहेत, असे सांगून कोविड-19 च्या नव्या स्ट्रेनच्या नियंत्रणासाठी व म्युकरमायकोसिस साठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी टास्क फोर्स ने पाहणी केली असून उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यातील नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, रुग्णसंख्येचा तपशील, रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्धता, जम्बो कोविड रुग्णालय व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, ऑक्सिजन व रेमडेसिवीर मागणी, सद्यस्थिती व पारदर्शक पद्धतीने वाटप तसेच पुणे जिल्ह्याचा रुग्णदर, मृत्युदर याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.भूजल सर्वेक्षण यंत्रणा विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वतःहून निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाद्वारे कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शक सूचना, त्रिसूत्रीचे पालन, अन्य आवश्यक नियमांचे पालन, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहार पद्धती आदी विषयी जनजागृतीवर करण्यात भर देण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.