जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असतानाच देशात मंकिपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत.राजधानी दिल्लीमध्ये मंकिपॉक्सने एन्ट्री केली आहे. दिल्लीत पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
दिल्लीतील 31 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या रुग्णाला दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मंकिपॉक्सची लागण झालेल्या या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याची कोणतीही माहिती नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.आतापर्यंत देशामध्ये मंकिपॉक्सचे चार रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. तर केरळमध्ये सर्वाधिक तीन रुग्ण आढळले आहेत.
मंकिपॉक्सच्या या सर्व रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मंकिपॉक्सच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यांच्याकडून उपाययोजना आखल्या जात आहेत.