देवगड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवेला गती; दोन नवीन मशीन कार्यान्वित, तंत्रज्ञही रुजू
देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवेत मोठी भर पडली असून CSR फंडातून प्राप्त झालेल्या दोन नव्या डायलिसिस मशीनचे कार्यान्वयन करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातील एकूण मशीनची संख्या चार झाली असून रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.
नवीन मशीन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला तंत्रज्ञही तत्काळ नियुक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे तंत्रज्ञाची नियुक्ती अल्पावधीत पूर्ण झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
यापूर्वी रुग्णालयात दोन मशीनच कार्यरत होत्या. वाढत्या रुग्णभारामुळे कर्मचारी वर्गावर मोठा ताण येत होता. ही बाब रुग्णालय समिती सदस्य व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर शासनस्तरावर त्वरित तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आला असून, आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यासाठीही सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे.
सध्या देवगड परिसरातील १९ रुग्ण डायलिसिससाठी प्रतीक्षेत आहेत. नव्याने उपलब्ध झालेल्या मशीनमुळे आता रुग्णांना अधिक सुलभ, जलद आणि नियमित डायलिसिस सेवा मिळण्यास सुरुवात होणार आहे.
या सुविधेच्या वाढीमुळे देवगड तालुक्यातील आरोग्यसेवेत मोठी सुधारणा होणार असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.


