रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ मार्फत शुक्रवार दि. २७ मे २०२० रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार आपल्या देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. ज्यामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण १०१.९ टक्क्याने वाढले असून २००० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण ५४.१६ टक्के इतके वाढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशासमोर येऊन मोठ्या अभिमानाने देशात नोटबंदी करत असल्याची घोषणा केली. देशातून भ्रष्टाचार दूर व्हावा आणि जनतेला सोसावी लागणारी महागाई कमी व्हावी, हे त्या मागचं मूळ असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं.
मात्र तसं झालं का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केलेला हा अहवाल मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी पुरेसा आहे.


