विविध रंगानी सजलेला होळीचा सण संपूर्ण देशभर साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी याचे स्वरूप वेगवेगळे आहे. कुठे रंग, कुठे पाणी, कुठे चिखल तर कुठे टोमॅटोच्या सहायाने होळी साजरी केली जाते. चला तर मग देशभर खेळल्या जाणाऱ्या या होळीच्या सणाला कसं साजरा करतात ते पाहूया…
🟦 इथे खेळतात पाण्याने होळी
भारताच्या शेजारचा देश म्यानमारमध्ये मेकांग या नावाने पाण्याचा सन साजरा केला जातो. याला थिंगयान असेही म्हणतात. म्यानमारला नववर्षाला मेकांग हा सण साजरा केला जातो. या उत्सवात म्यानमार देशातील सगळेजण सहभागी होतात. लोकं एकमेकांवर रंग व पाण्याची उधळण करतात. एकमेकांवर पाणी उडवून पाप धुतले जातात अशी तिकडच्या लोकांची धारणा आहे.
🟪 इथे चिखल व थंड पाण्याने खेळतात होळी
भारतातील होळीप्रमाणेच दक्षिण कोरियामध्ये मड फेस्टीव्हल आयोजित केला जातो. हा उत्सव दर वर्षी जुलै महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी सगळे एकमेकांना माती लावतात व चिखल फेकतात. याव्यतिरिक्त थायलंड मध्ये होळी सारखाच सोंगक्रन नावाचा सण एप्रिल महिन्यात साजरा केला जातो. यात सगळे लोकं एकमेकांवर थंड पाणी उडवून नवीन वर्षाचे स्वागत करतात.
🟧 इथे खेळतात संत्री व टोमॅटो ने होळी
इटली मध्ये फेब्रुवारी महिन्यात बेंटल ऑफ द ऑरेंज फेस्टिवल साजरा केला जातो. यात सगळे लोकं एकमेकांवर संत्री फेकतात. याव्यतिरिक्त स्पेन मध्ये होळीसारखाच टोमॅटो उत्सव साजरा केला जातो.इथं एकमेकांना टोमॅटो मारून आनंद व्यक्त करतात.
🟪 जपान मध्ये असतो वेगळाच उत्सव
जपान मध्ये साजरा होणारा हा सण वेगळाच असतो. तिथे अनोख्या पद्धतिने होळी उत्सव साजरा होतो. हा उत्सव मार्च-एप्रिल महिन्यात साजरा केला जातो. या महिन्यात साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. हा काळ चेरीच्या झाडांना फुलं येण्याचा काळ असतो. लोकं आपल्या कुटुंबासोबत चेरीच्या बागांमध्ये बसून एकमेकांना शुभेच्छा देतात. लोकं झाडांवरून पडणाऱ्या फुलांची उधळण करून एकमेकांचे स्वागत करतात. या दिवशी सुग्रास भोजन व गाणी-नृत्य यांचेसुद्धा आयोजन केले जाते. तशी परंपरा आहे.
🟥 पोलंडमध्ये भारतासारखाच आहे होळीचा सण
पोलंडमध्ये अर्सीना नावाने होळीसारखाच उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोकं एकमेकांवर रंगांची उधळण करतात. एकमेकांना मिठी मारतात. जुने शत्रुत्व विसरून नवीन नाती तयार करण्यासाठी हा एक श्रेष्ठ उत्सव मानला जातो. चेकोस्लोव्हाकिया मध्ये बलिया कनौसे नावाचा उत्सव होळीसारखाच साजरा केला जातो. या वेळी लोकं एकमेकांवर रंग उडवतात व सोबत नाच-गाणी करतात.
🟨 जर्मनीत असतो एक वेगळाच साज
जर्मनीत रैनलैंड नावाने होळी सारखा सण १ नव्हे तर तब्बल ७ दिवस साजरा केला जातो. या वेळी लोकं आगळा वेगळा पोशाख करतात व एकमेकांशी आगळा वेगळा व्यवहार करतात. मोठे-लहान सगळेच एकमेकांशी हास्यविनोद करतात. या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. यावेळी केलेल्या हास्य-विनोदाचे कोणी वाईट वाटून घेत नाही.
🔵 पेरूमध्ये होळीसारखा इनकान उत्सव
पेरूमध्ये इनकान उत्सव ५ दिवस साजरा केला जातो. या उत्सवात संपूर्ण शहर विविध रंगानी नटलेलं असतं. सगळे लोक रंगीबेरंगी पोशाख करून शहरात समुहात फिरतात. प्रत्येक समुहाची एक थीम असते. समुहातील लोकं ड्रमच्या आवाजावर नृत्य करतात. सर्व्या समूहात नवीन थीम दाखवण्याची स्पर्धा रंगते. रात्री कुजको नावाच्या एका महालात एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
🟡ऑस्ट्रेलियात चारही बाजूंना दिसतात टरबूज
ऑस्ट्रेलियात होळीसारखाच एक अद्भुत उत्सव साजरा केला जातो. भारतात होळीच्या दिवशी सगळी कडे रंगच रंग दिसून येतात तसेच इथे चारही बाजूंना टरबूज दिसतात. या उत्सवात असे वाटते की जणूकाही टरबूजांची नदी वाहते आहे. या उत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात ज्यात येथील लोकं सहभाग घेतात.


