देश-विदेश: ग्रामीण भारताचा वैद्यकीय दीपस्तंभ – टेलिमेडिसिन सुविधा

0
50
भारत फोर्ज,Telemedicine,
ग्रामीण भारताचा वैद्यकीय दीपस्तंभ - टेलिमेडिसिन सुविधा

भारतासारख्या १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशात वैद्यकीय सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हे एक आव्हान आहे. शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे तुलनेने सुलभ आहे, पण ६६ टक्के जनता ज्या ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करते, तिथे आजही प्राथमिक वैद्यकीय सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवणे महाकठीण आहे. https://sindhudurgsamachar.in/वेंगुर्ला-तालुक्याचा-बार/

  महाराष्ट्रातील अनेक दुर्गम गावे, वाड्या व वस्त्यांमध्ये, जिथे मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तिथे आरोग्य सुविधा मिळणे तर दुरापास्तच! बहुतांश गावांतील स्त्री-पुरुष शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करतात. रोजच अर्धपोटी राहणाऱ्या या लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेता येणे शक्य नसते. जगण्याचा संघर्षच एवढा मोठा असतो की, त्यापुढे बाकी सारे काही मागे पडते. अशात छोट्यामोठ्या आजारांमुळे जर रोजगार बुडला तर अख्खे घरच उपाशी राहते.

 अशावेळी आजार लपवण्याकडे किंवा दुखणे अंगावर काढण्याकडेच कल असतो. आणि असे केल्याने जर आजार बळावला तर त्या कुटुंबाला कोणी वाली नसतो. कारण गावात एक तर कायमस्वरूपी डाॅक्टर नसतात. आणि तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी जवळ पैसा नसतो. घरातील लहान मुले आजारी पडली तरी रोजगार मिळवण्यासाठी कामावर जावेच लागते.

शासकीय स्तरावरील प्रयत्न

अशा अत्यंत गरीब आणि कोणत्याच सुविधांचे वारे न लागलेल्या असहाय्य जनतेच्या  आरोग्यरक्षणासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.  देशभरात ठिकठिकाणी तब्बल १,५०,००० आरोग्य कल्याण केंद्रे स्थापन करून शासन सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व वयोगटांतील लोकांचे आरोग्य चांगले राहावे,  या हेतूने प्रतिबंधात्मक आणि आरोग्याला चालना देणारा आरोग्यविषयक सजग दृष्टिकोन बाळगण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वरील आरोग्य कल्याण केंद्रे दुर्गम भागांसहित संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांना सर्वांगीण आरोग्य सुविधा पुरवतात, ज्यामध्ये रुग्णसेवा, नवजात शिशु व मातेची आरोग्यविषयक देखभाल अशा सुविधांचा समावेश असतो.पण शासनाचे हे उपायही कोविड १९ साथीच्या काळात अतिशय तोकडे पडले. २०१९-२० मध्ये कोविड महामारीने जगभर थैमान घातले होते. जिथे विकसित देशांतील आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडल्या, तिथे अफाट लोकसंख्या आणि वैद्यकीय सुविधांचे जाळे विकसित नसलेल्या भारताची परिस्थिती काय झाली असेल? पण सरकारने याच काळात  टेलिमेडिसिन क्षेत्राला अधिकृत मान्यता दिली व वैद्यकीय सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग प्रशस्त केला.

ग्रामीण महाराष्ट्र आणि भारत फोर्ज

भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब कल्याणी यांची मूळ कौटुंबिक पार्श्वभूमी खेड्यातील असल्याने ग्रामीण भागांतील विविध समस्यांविषयी त्यांना जाण आहे व त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सीएसआर प्रकल्पांतर्गत भारत फोर्जने निवडक १०० गावांतील सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले. पाणी, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि रोजगार यांबाबत ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी गावकरी आणि भारत फोर्ज एकजुटीने प्रयत्नशील आहेत आणि त्यातून गावाचा कायापालट होत आहे.

टेलिमेडिसिन सुविधा म्हणजे काय?

सर्वसामान्यांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सोसावा न लागता देशांतर्गत स्तरावर कोठेही चांगल्या दर्जाच्या प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सुविधांचा दर्जा सुधारणे, आणि आरोग्यसुविधा वितरणाचा खर्च कमी करणे, यासाठीचा आदर्श उपाय म्हणजे टेलिमेडिसिन सुविधा ! टेलिमेडिसिन सुविधांमधून व्हिडिओ काॅलद्वारे ग्रामीण भागांतील अगदी शेवटच्या घटकापर्यंत प्राथमिक आरोग्य सुविधा व वैद्यकीय मार्गदर्शन पोहोचविता येते.

टेलिमेडिसिन सुविधा पुरविण्याचा घेतला ध्यास

टेलिमेडिसिन सुविधा क्षेत्राला मान्यता मिळाल्यानंतर वर्ष २०२१ मध्ये बाबासाहेब कल्याणी यांच्या सक्षम मार्गदर्शनांतर्गत आणि डोअरस्टेप हेल्थ सर्व्हिसेसच्या सहकार्याने भारत फोर्जने महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्यांत सॅटेलाईट सुविधेच्या साहाय्याने टेलिमेडिसिन सुविधेचा शुभारंभ केला. पुणे जिल्ह्य़ातील आंबेगाव तालुक्यातील ठाकरेवाडी, चिखली, फडाळेवाडी येथील वाड्या वस्त्यांवर तसेच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामणेर, कण्हेरखेड, रुई, नागझरी व जयपूर अशा एकूण आठ गावांमध्ये ८ टेलिमेडिसिन सेवा केंद्रे उभारून भारत फोर्जने महाराष्ट्रातील टेलिमेडिसिन सुविधांचा भक्कम पाया रचला. या सर्व गावांतील व वाड्यांतील लोक अतिशय हलाखीचे जीवन जगत असून वैद्यकीय सुविधांंपासून वंचित आहेत. रोजची भाजी भाकरी मिळवण्यासाठी येथील लोकांना रात्रीचा दिवस करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याप्रति जागरूक करणे हे मोठे आव्हान होते.

अशी लावली सवय

वरील गावांत व्हिडिओ काॅलद्वारे वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याची सवय ग्रामस्थांना लावणे व या सुविधेप्रति त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी भारत फोर्जने प्रत्येक टेलिमेडिसिन केंद्रात दोन अनुभवी स्थानिक परिचारिकांची नियुक्ती केली. त्यांच्याशी गावकरी परिचित असल्याने आधुनिक टेलिमेडिसिन सुविधा आणि पारंपरिक वैद्यकीय सुविधा यांमधील अंतर कमी झाले आणि ग्रामस्थ या केंद्रांशी जोडले गेले. आजार, आणि उपचारांबरोबरच औषधे मिळण्याची सुविधा येथे असल्याने गावकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात भारत फोर्जला यश आले. या केंद्रांमुळे प्राथमिक उपचार मिळवण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागत असलेली पायपीट थांबली आहे. एकूण ८ गावांमध्ये यशस्वीपणे राबवल्या जात असलेल्या टेलिमेडिसिन सुविधेचा लाभ भारत फोर्जने आजवर ३८,७९७ गावकऱ्यांना दिला आहे.

भारत फोर्जच्या टेलिमेडिसिन सुविधेचे फायदे

* * दुर्गम, अतिदुर्गम भागात Outreach programme च्या माध्यमातून आरोग्यसुविधेचा थेट लाभ

* * ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक जागरूकतेत वाढ. विशेषत: सकस आहार आणि पुरेशा व्यायामाचे महत्त्व         गावकऱ्यांना कळले.

* * सर्दी, खोकला, ताप, असे किरकोळ आजार आणि छोट्यामोठ्या जखमांवर तात्काळ इलाज व औषधोपचार शक्य.

* * तात्काळ उपचारांमुळे हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांची रोजंदारी बुडण्याचा धोका कमी. आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी अत्यंत उपयुक्त सेवा

* * हृदयविकार, मधुमेह, यांसारख्या गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन रुग्णास त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी भरती करता आले.


“टेलिमेडिसिन या भारत फोर्जने दिलेल्या आरोग्य सुविधेमुळे आमच्या आदिवासी भागाला खूप फायदा झाला. रोजंदारीवर काम करणाऱ्या, मोलमजुरी करणार्‍या गरीब वर्गासाठी ही सुविधा खूप महत्त्वाची वाटते. भीमाशंकर खोर्‍यात वसलेल्या आमच्या आदिवासी जनतेला त्यांची उपजीविकेची सुविधा फार महत्त्वाची वाटते. पण कामावर गेल्यानंतर त्यांना होणारे आजार, थकवा, साथीचे रोग, इ.मुळे त्यांचे शारीरिक नुकसान तर होतेच, आणि त्यांना आर्थिक झळही सोसावी लागते. परिणामी, टेलिमेडिसिन सुविधा त्यांना खूपच महत्त्वाची वाटते. या सुविधेमुळे येथील लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि छोट्यामोठ्या आजारापासून बचाव होऊ लागला आहे. भारत फोर्जचे मनापासून आभार!”

आशा खंडू पारधी सरपंच, ठाकरवाडी, पुणे

ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी सुविधा

ग्रामीण महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम भागातही तात्काळ वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी ही टेलिमेडिसिन सेवा ग्रामस्थांसाठी जीवनदायी ठरत आहे. किरकोळ आणि गंभीर आजार तसेच तातडीच्या परिस्थितीत वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन या सुविधेमधून मिळू शकते. याखेरीज, दूरस्थ पद्धतीने घेतली जाणारी आरोग्यविषयक मार्गदर्शक सत्रे, रुग्णांसाठी फिजिओथेरपी व्यायाम, आणि हिमोग्लोबीन व रक्तातील साखरेची तपासणी अशा कार्यक्रमांचे आयोजनही या केंद्रांमध्ये केले जाते. आपत्कालीन परिस्थिती हाताळता यावी, म्हणून टेलिमेडिसिन केंद्रांवर कार्यरत कर्मचारी आणि ग्रामस्थांना कंपनीतर्फे कृत्रिम श्वासोच्छ्वास (सीपीआर) प्रशिक्षणही दिले जाते.

टेलिमेडिसिन केंद्रांवरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांचा लाभ ग्रामस्थांना होताना दिसत आहे. स्तनांचा कर्करोग, संधिवात, रक्तक्षय (ॲनिमिया) इत्यादी महत्त्वपूर्ण आजारांबरोबर फ्रॅक्चर झाल्यास काय करावे, याबद्दलची माहिती, काळजी आणि प्रतिबंधनाविषयी तज्ज्ञ डाॅक्टर ग्रामस्थांना मार्गदर्शन करतात. याशिवाय, भारत फोर्जचे सीएसआर कर्मचारी गावोगावी भेटी देऊन टेलिमेडिसिन सुविधांचा लाभ घेण्याविषयी ग्रामस्थांना उत्तेजन देत असतात.

ग्रामीण भारताच्या आरोग्यदायी जीवनासाठी आशेचा किरण

आरोग्यसंपन्न भारताच्या निर्माणासाठी भारत फोर्जने सुरू केलेल्या टेलिमेडिसिन सुविधांचा लाभ आजवर येथील तब्बल १६,८६६ ग्रामस्थांनी घेतला असून दर्जेदार आरोग्य सुविधांवर आपलाही अधिकार आहे, ही सुखद जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे. जागतिक महासत्ता होण्याच्या प्रवासात भारतीयांना दर्जेदार आरोग्यसुविधा देण्यास भारत कटिबद्ध असल्याचे आश्वासक चित्र निर्माण करण्याचे काम शासनाबरोबरच आपलेही आहे, असे भारत फोर्ज मानते. त्या दृष्टीने टेलिमेडिसिन सुविधा उपलब्ध करून देऊन भारत फोर्जने ग्रामीण भागाला आशेचा किरण दाखवला आहे. यापुढेही ग्रामीण भारताचे आरोग्य चित्र अधिकाधिक निरामय करण्याकामी भारत फोर्ज आपले योगदान देतच राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here