मुंबई ३० मार्च : शिस्त, समर्पण आणि निर्धार या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास तुम्हाला तुमच्या क्रिकेट कारकिर्दीत यशोशिखर गाठणे आणि लवकरात लवकर आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचणे शक्य होईल असे प्रतिपादन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केले. १३ वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. माहुल, चेंबूर येथील अकादमीच्या मैदानात हा सोहळा संपन्न झाला. शॉन कोरगावकर याच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर कोळी क्रिकेट फौंडेशन संघाने गणेश पालकर क्रिकेट क्लब संघावर ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सागर-रक्षकांना-टी-शर्टच/
तत्पूर्वी ३५ षटकांच्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाला २३.४ षटकांत केवळ सर्वबाद १०६ धावांचीच मजल मारता आली. आकाश मांगडे (३७) याचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. शॉन कोरगावकर याने आपल्या प्रभावी गोलंदाजीने केवळ २२ धावांत ५ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही, डॉंनी डायस याने ८ धावांत २ बळी मिळवत त्याला मोलाची साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना कोळी क्रिकेट फौंडेशन संघाला मिहीर सावंत (१६) आणि प्रचित आमकर (२२) यांनी ४९ धावांची सलामी दिली आणि त्यानंतर वेद तेंडुलकर (नाबाद १५ ) आणि शॉन कोरगावकर (नाबाद ३०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची अभेद्य भागीदारी रचून संघाचा विजय साकार केला. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शॉन कोरगावकर याचीच निवड करण्यात आली मात्र त्याने आपला गोलंदाजीतील सहकारी डॉंनी डायस याने छान गोलंदाजी केल्याने त्याला हा पुरस्कार देण्याची विनंती केली. या स्पर्धेत चार सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळविणाऱ्या शॉन कोरगावकर ( ११६ धावा आणि १६ बळी ) यालाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून आयुष शिंदे (दोन शतकांसह २३५ धावा), सर्वोत्तम गोलंदाज म्हणून शॉन कोरगावकर ( १६ बळी ) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्रेयश गोवरी यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या निवड समितीचे माजी चेयरमन दीपक जाधव, एजिस फेडरेलचे व्हाईस प्रेसिडेंट प्रकाश ठाकर आणि मुंबई महागरपालिकेच्या “एम” वॉर्डचे विश्वास मोटे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – गणेश पालकर क्रिकेट क्लुब – २३.४ षटकांत सर्वबाद १०६ (आकाश मांगडे ३७ ; शॉन कोरगावकर २२/५ , डॉंनी डायस ८/२)पराभूत वि. कोळी क्रिकेट फौंडेशन २०.२ षटकांत २ बाद १०७ (मिहीर सावंत १६, प्रचित आमकर २२, वेद तेंडुलकर नाबाद १५, शॉन कोरगावकर नाबाद ३०).