नवी दिल्ली- जुगार, बेटिंग, कर्जपुरवठा व मनी लाँडरिंगशी संबंधित चीन व इतर देशांची सुमारे २३२ ॲप केंद्र सरकारने ब्लॉक केली आहेत. हा आदेश शनिवारी संध्याकाळी जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. अशी कारवाई करण्याची सूचना केंद्रीय गृहखात्याने इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याला केली होती.
त्या खात्याच्या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की , ब्लॉक केलेल्या २३२ पैकी १३८ ॲप हे बेटिंग, जुगार, मनी लाँडरिंगशी संबंधित, तर उर्वरित ९४ ॲप हे कर्जपुरवठ्याशी निगडीत आहेत. मात्र त्या ॲपच्या नावांचा तपशील केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. चीन व इतर देशांमधून ही ॲप चालविली जात होती. या ॲपमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आली. चीनने ॲपच्या माध्यमातून भारतीयांना कर्जाच्या सापळ्यात अडकविले आहे. कमी व्याजदराने कर्ज देण्याचे प्रलोभन दाखवून हे चिनी ॲप लोकांना आपल्याकडे वळवितात. त्यानंतर दरसाल अवाजवी व्याज आकारले जाते. कर्जवसुलीसाठी या ॲपच्या कर्मचाऱ्यांकडून लोकांना धमक्याही देण्यात येत होत्या. आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये काही लोकांनी आत्महत्या केली. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्राने या चिनी ॲपवर कारवाई केली.
कर्जपुरवठा करणाऱ्या चिनी ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग होत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. शेल कंपन्यांद्वारे हे सर्व व्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले. या ॲपद्वारे कर्ज घेतलेल्यांपैकी ज्यांच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत, त्यांना धमकीचे फोन आले होते. अशा सर्व घटनांचा तपास करण्यात आला. ज्या ॲपद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याने त्यांना ब्लॉक करण्यात आले.
केंद्र सरकारने याआधी चीनचे २५० ॲप ब्लॉक करण्याची कारवाई केली होती. कारवाई केलेल्या ॲप्समध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर आदींची समावेश होता. पब्जी मोबाइल गेम ॲपही सरकारकडून ब्लॉक करण्यात आले होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व यांना धोका पोहोचविणाऱ्या ॲपविरोधात केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.


