केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत Shivsena, वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्याचसोबत शिवसेना कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करण्यास देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ उडाला. नारायण राणे समर्थकांनी शिवसैनिकांनी लावलेले पोस्टर्स फाडले. एवढं नाही तर दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली.
युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक आमने-सामने आल्याने जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या बंगल्याजवळ ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
नाशिक येथे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुख्य संपर्क कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली. नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी नाशिक, पुणे आणि महाडमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक आणि पुणे पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूनला रवाना झाले आहे. सध्या नारायण राणे चिपळूनमध्ये असून याठिकाणावरुन त्याची जनआशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे.


