मुंबई : कोरोना ओमायक्रोन या नव्या विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. भारतातही कर्नाटक,गुजरात महाराष्ट्रात या ओमायक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 10 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा 18 वरून 15 वर्षे करावी अशी एक मागणी करण्यात आली आहे. जेणेकरुन महाविद्यालये आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचं लसीकरण करता येईल. त्याच प्रमाणे आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिसरा डोस देण्यात यावा अशी दुसरी प्रमुख मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना लिहिलेले हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर देखील शेअर केले आहे.
त्याशिवाय आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाच्या दोन डोस मधील अंतर कमी करण्याची विनंती देखील केली आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर चार आठवड्यांचे केले तर जानेवारी 2022 पर्यंत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना दोन्ही डोस देण्याचे उद्दीष्ट पूर्ण करता येईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.