मुंबई, दि. 1 : नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुने पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र संचालनालयाने सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेनेच्या या यशासाठी आयोजित कौतुक सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते
या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु.अदिती तटकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी, प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पंतप्रधान बॅनर सुपूर्द करण्यात आला, तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.