रत्नागिरी- समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी दापोली, गुहागर येथे सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी ‘प्रथमा’ने वेळासपासून २५० किलोमीटरचे अंतर पार केले तर ‘सावनी’ काही अंतर पार केल्यानंतर पुन्हा मुरुडच्या दिशेने माघारी परतली आहे. टॅगिंग केलेल्यापैकी चार कासव संपर्कात असून ‘लक्ष्मी’ संपर्काबाहेर आहे.’प्रथमा’ कासव मुंबई परिसरातच मुक्कामी थांबल्याचे दिसून येते मात्र ती गुजरातच्या दिशेने पुढे सरकरण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासव अंडी घालण्यासाठी येतात. कासवांच्या संवर्धनासाठी वनविभागासह कासवमित्रही सातत्याने काम करत असतात. कासवे किनाऱ्यांवर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, यावर अद्याप अभ्यास झालेला नव्हता. यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर किनाऱ्यांवर पाच कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आले. कोकणातील किनाऱ्यांवर अंडी घातल्यानंतर त्या कासवांचा पुढील प्रवास सुरू झाला आहे.टॅगिंगद्वारे कासव कुठे आणि कसा प्रवास करतात, याची माहिती गोळा केली जात आहे.
वेळास येथून सोडण्यात आलेल्या पहिल्या ‘प्रथमा’ कासवाने २५० किलोमीटर अंतर पार केले असून, ते सध्या डहाणूपासून ८६ किलोमीटर खोल समुद्रात आहे. तेथून ते गुजरातच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.सावनीने आंजर्ले किनाऱ्यावर २५ जानेवारीला ८७ अंडी घातली. त्यानंतर पुन्हा महिन्याभराने केळशी किनारी अंडी घातली. कासवे कमी कालावधीत पुन्हा अंडी घालू शकतात, याची नोंद या निमित्ताने अभ्यासकांना करता आली. पाच कासवांपैकी गुहागर किनाऱ्यावर टॅगिंग केलेल्या ‘लक्ष्मी’ कासवाचा संपर्क अल्पावधीत तुटला आहे. २ मार्च रोजी शेवटची नोंद झाली.रत्नागिरी