मुंबई- बॉलिवूडचे दिग्गज गायक बप्पी लहरी यांचे मंगळवारी रात्री 11.45 वाजता निधन झाले. कोलकातामध्ये बप्पी यांचा जन्म झाला होता. मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६९ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1980 आणि 90 च्या दशकात बप्पी दा यांनी सिनेसृष्टीला जबरदस्त संगीत दिले.शराबी,नमक हलाल, डान्स डान्स,डिस्को डान्सर सारखे चित्रपट त्यातील गाण्यांमुळेही तेवढेच गाजले.1982 मध्ये आलेल्या ‘डिस्को डान्सर’साठी बीचिंगमध्ये ‘चायना अवॉर्ड’ मिळाला होता.त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
बप्पी दा यांना एक मुलगी रीमा असून तीगायिका आहे. तर बप्पी दा यांच्या मुलाचे नाव बाप्पा लहरी असून तो संगीतकार आहे आणि त्याचे लग्न तनिषा वर्मासोबत झाले आहेत. त्याला एक मुलगा असून क्रिश हे त्याचे नाव आहे.
बॉलिवूडचे सेलिब्रिटी अक्षय कुमार, अजय देवगण, विद्या बालन, चिरंजीवी, विशाल ददलानी, मनोज मुंतशिर, कैलाश खेर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून बप्पी दादांना श्रद्धांजली वाहत आहेत.बप्पी लहरी यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांचा मुलगा बाप्पा सध्या अमेरिकेत असून उद्या दुपारपर्यंत तो मुंबईत पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.