सिंधुदुर्गuday samant – कोविडच्या महामारीचा लाभ घेऊन काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. विशेषतः वैभववाडी आणि दोडामार्ग याठिकाणी लक्ष केंद्रीत करावे. गेल्या तीन वर्षात विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंचा रुग्णालयनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.
आठवडानिहाय जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट, लसीकरण, मृत्यूदर, बरे होऊन घरी गेलेले रुग्णसंख्या याबाबतची माहिती घेऊन पालकमंत्री म्हणाले, चाचण्यांचे प्रमाण अजूनही वाढवा. त्याचबरोबर लसीकरणावरही भर द्या. अशा, अंगणवाडीसेविका, त्याचबरोबर परिचारिका यांना आवश्यक असणारी साधनसामुग्री वेळच्यावेळी द्यावी. गेल्या तीनवर्षात विविध कारणांनी जिल्ह्याचा मृत्यूदर कसा होता, याबाबतचा एक अहवाल सादर करावा. यामध्ये खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयाकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या आणि त्यांना असणारे अजार, याबाबतचा समावेश असावा. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात विशेषतः दोडामार्ग आणि वैभववाडीमध्ये काही बोगस डॉक्टर्स वैद्यकीय उपचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचना करून खासदार श्री. राऊत म्हणाले, आयुष रुग्णालयात दोन वर्ग खोल्या करण्याबाबत आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. त्याचबरोबर लसीकरणावरही भर द्यावा. रुग्णांच्या नातेवाईकांवर खासगी रुग्णालयाकडून बिलांची जादा आकारणी होऊ नये याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या लेखाधिकाऱ्यांकडून बिले कमी केल्याबाबतची माहिती घ्या. यावेळी संदेश पारकर, डॉ. संदेश कांबळे, तहसिलदार रमेश पोवार, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते.
कणकवली तहसिल कार्यालयात पालकमंत्री श्री. सामंत यांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने उपस्थित होते.