मच्छिमार महिलांच्या सुरक्षेसाठी नितेश राणेंचे पाऊल
मत्स्यव्यवसाय विभागाने कोळंबी सोलताना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि मासळी बाजारातील अस्वच्छतेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी कोळंबी सोलणाऱ्या महिलांना उच्च दर्जाचे विशेष हातमोजे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. भाजप आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू
राणे म्हणाले की, कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना जखमा होतात, नखांना इजा होते आणि कधी रक्तस्रावही होतो. हा त्रास पाहता ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तसेच परदेशातून टिकाऊ आणि सुरक्षित ग्लोव्हज मागवण्यात आले आहेत. हे हातमोजे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत लवकरच बाजारातील सर्व कोळंबी विक्रेत्या महिलांपर्यंत पोहोचवले जातील.
मासळी बाजारातील कचरा, दुर्गंधी आणि स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाल्यावर राणे म्हणाले की, अनेक बाजारपेठांमधील कचरा व्यवस्थापन आणि दुर्गंधी नियंत्रणासाठी विभागाने आधीच कामे सुरू केली आहेत. या संदर्भात लवकरच आमदार उमा खापरे यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन सर्व तपशील सादर केले जातील.
दरम्यान, क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी विक्रेत्यांचे महात्मा फुले मंडईत स्थलांतराच्या प्रश्नावरही स्पष्टीकरण देताना मंत्री राणे म्हणाले की, BMC आयुक्तांसोबत बैठक घेऊन पुनर्विकासाचा आराखडा मच्छिमार प्रतिनिधींना दाखवण्यात आला आहे. त्यांच्या सूचना मान्य करून आराखड्यात सुधारणा करण्यात येत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात विक्रेत्यांना भूमिगत जागा देण्याचा प्रस्ताव असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा वरच्या मजल्यावर उत्तम सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही उपाययोजना राबविल्यानंतर मच्छिमार महिलांचा त्रास कमी होणे, मासळी बाजारातील स्वच्छता सुधारणे आणि पुनर्विकास प्रकिया वेगाने पुढे सरकण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


