मुंबई : राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून राज्य एकसंघपणे काम करीत आहे, असे चित्र निर्माण करण्याचे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. राज्यातील गुंतवणूकीसंदर्भात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वेदांता फॉक्सकॉन, सिनारमस, सॅफ्रॉन एअरबस यासारखे प्रकल्प कोणाच्या नाकर्तेपणामुळे राज्याबाहेर गेले याबाबत श्वेतपत्रिका जाहीर केली जाईल असेहीं मंत्री श्री. उदय सामंत यांनी सांगितले.
श्री. सामंत म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन, सिनारमस, सॅफ्रॉन या कंपन्यांची गुंतवणूक राज्याबाहेर गेली असल्याचे आरोप होत आहेत. याबाबतच्या वस्तुस्थितीबाबत महामंडळाने यापूर्वीच खुलासा केलेला आहे. आवश्यकता पडल्यास याबाबत श्वेतपत्रिका जाहीर केली जाईल. ज्या प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा असेल असे प्रकल्प लवकर सुरु करण्यात येतील.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत रांजणगाव (पुणे) येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली असून, असे अनेक प्रकल्प केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यात येतील, कारण अधिकाधिक प्रकल्प राज्यात यावेत आणि युवापिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यावर शासनाचा भर असल्याचे मंत्री श्री.उदय सामंत यांनी सांगितले.


