महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन 2026 आयोजन
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले असून, यावर्षीचे प्रदर्शन कलाकार विभाग आणि विद्यार्थी विभाग अशा दोन स्वतंत्र विभागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कला संचालनालयाकडून दरवर्षी आयोजित होणारे हे राज्य स्तरीय कला प्रदर्शन कलाकार आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन फेब्रुवारी 2026 मध्ये सांगली येथे पार पडणार असून, तर
कलाकार विभागाचे राज्य कला प्रदर्शन १० ते १६ मार्च 2026 या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.
याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली.
राज्यातील शासनमान्य अशासकीय 19 अनुदानित कला महाविद्यालयांच्या प्राचार्यांसोबत झालेल्या या बैठकीत कला शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कला शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, आधुनिक व विद्यार्थ्यांपर्यंत सहज उपलब्ध व्हावे यासाठी शासन विविध उपाययोजना राबवणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव संतोष खोरगडे तसेच अनुदानित कला महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


