मुंबई, दि. 13 : सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून घेण्यासाठी अर्ज करण्याची किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.
तसेच 2020-21 या वर्षात ज्या विध्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी असतील त्या विद्यार्थ्यांनादेखील त्रुटींची पूर्तता करण्यास किंवा अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेतात. यावर्षी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेत. त्यामुळे दि. 12 जानेवारीपर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचा विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असेही आवाहन श्री.मुंडे यांनी केले आहे.


