मुंबई दि. २६ : महिला व बालविकास विभागांतर्गत गट – अ व गट – ब संवर्गातील रिक्त पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यानंतर ही रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवण्यात येईल, असे महिला व बालविकास विभागाने कळविले आहे.
सद्यस्थितीत महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट – अ व गट – ब संवर्गातील पदे दि. २८ जून २००६ रोजीच्या सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहेत. तथापि, या पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम राज्यपाल यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. मंजुरीनंतर ही पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेने भरण्यात येणार आहेत. सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यावर लोकसेवा आयोगास मागणीपत्र विभागाकडून पाठविण्यात येईल, असेही महिला व बालविकास विभागाने कळविले आहे.