आपण ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेला राम राम का ठोकला, याबाबत तिनं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘शेवंता’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. पण ‘शेवंता’ साकारणं आपल्यासाठी सोपं नव्हतं. त्यासाठी 10 किलो वजन वाढवावं लागलं होतं. परंतु त्यानंतर वाढलेल्या वजनावर निगेटिव्ह कमेंट्स ऐकाव्या लागल्याचं अपूर्वानं म्हटलं आहे. ‘शेवंता’ या व्यक्तीरेखेबद्दल आपल्या विशेष जिव्हाळा आहे. तरीही कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं अपूर्वानं म्हटलं आहे. पुढील काळात अजून चांगला अभिनय आपल्या हातून होईल, अशी आशावाद देखील अपूर्वानं व्यक्त केला आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचे शूटिंग सावंतवाडीत सुरू आहे. अपूर्वा 12 तास प्रवास करून सावंतवाडीत पोहोचत होती. त्यात वाहिनीनं दुसरी मालिका देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासनही वाहिनीनं पाळलं नाही. त्यामुळे आपलं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं अपूर्वानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर ‘झी युवा’वरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेचा शेवटचा चेक न मिळाल्याचंही अपूर्वानं सांगितलं आहे.
शेवटी अपूर्वानं लिहिलं आहे, की ज्या ठिकाणी आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही, जिथे आपल्या कामाची अवहेलना होते, अशा ठिकाणी काम करणं आपल्या तत्त्वात बसत नाही.