‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’च्या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबनाला नवे बळ — मंत्री आदिती तटकरे
मुंबई : महिलांना आपल्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोहा येथे स्थापन करण्यात आलेल्या ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’चे लोकार्पण करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या या उपक्रमामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला आणि आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. https://sindhudurgsamachar.in/आदिशक्ती-अभियानला-राज्/
रोहा (रा.) येथे झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात आमदार अनिकेत तटकरे, माविमचे महाव्यवस्थापक महेंद्र गमरे, प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद प्रतिनिधी, महिला बचतगटांच्या सदस्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, “रोहा तालुक्यातील महिलांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या गारमेंट युनिटमुळे महिलांना कौशल्य प्रशिक्षणासह स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या स्थिर संधी उपलब्ध होतील. त्यामुळे महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला गती मिळेल आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू होईल,” असे त्या म्हणाल्या.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून सुरु झालेल्या या नवउद्योगामुळे ग्रामीण भागातील महिलांना केवळ आर्थिक बळच नाही, तर आत्मविश्वास आणि सामाजिक ओळखही मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


